Homeकला - क्रीडाफुलेवाडीचा प्रॅक्टीस क्लबवर विजय

फुलेवाडीचा प्रॅक्टीस क्लबवर विजय

कोल्हापूर :
पूर्वार्धात मिळालेली २-० गोलची आघाडी अखेरपर्यंत राखत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर विजय मिळवला. या विजयामुळे फुलेवाडीच्या खात्यावर तीन गुणांची नोंद झाली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा सुरू आहे. बुधवारी सिनियर -८ गटातील फुलेवाडी आणि प्रॅक्टीस क्लब यांच्यातील सामना अटीतटीने खेळला गेला. पूर्वार्धात फुलेवाडीकडून उत्तम रायने १३व्या मिनिटास पहिला गोल नोंदवत संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. चढायातील सातत्य कायम राखून फुलेवाडीने २६व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवून आघाडी २-० अशी भक्कम केली. उत्तम रायच्या पासवर दिग्विजय सुतारने हा गोल केला. गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टीस क्लबकडून आकाश बावकर, केवल कांबळे, साहिल डाकवे, अजिंक्य नलवडे, सागर चिले यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या.
उत्तरार्धात गोलची आघाडी वाढवण्यासाठी फुलेवाडीच्या उत्तम राय, श्याम कुमार, दिग्विजय सुतार, अक्षय पाटील, सिध्दार्थ पाटील यांनी खोलवर चाली रचल्या. काही चढायांमध्ये गोलजाळ्याच्या दिशेने मारलेल्या चेंडूला प्रॅक्टीस क्लबचा गोलरक्षक जुडसन याने तितक्याच तत्परतेने परतावून लावत गोलचे संकट टाळले. त्याने उत्कृष्ट गोलरक्षण केले. गोलची आघाडी कमी करण्यासाठी प्रॅक्टीस क्लबकडून वेगवान खेळ झाला. यामध्ये केवल कांबळे, ओम पोवार, साहिल डाकवे यांनी सोप्या संधी गमावल्या. ओम पोवारने मारलेल्या फटक्यावर गोलजाळ्यात जात असलेल्या चेंडूला फुलेवाडीच्या बचावफळीतील आदित्य तोरस्करने तत्परतेने बाहेर काढून होणारा गोल वाचविला. अखेरच्या क्षणात सूरज जाधवला गोलची सोपी संधी मिळाली पण त्याला फायदा उठवता आला नाही. अखेर पूर्णवेळेत २-० गोलची आघाडी कायम राखून फुलेवाडीने विजय साकारला.
——————————————————-
   आजचे सामने…
• उत्तरेश्वर – पीटीएम (ब) : दु. १:३० वा.
• जुना बुधवार – दिलबहारा : दुपारी ४ वा.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
33 %
4.1kmh
20 %
Sun
30 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page