Homeसामाजिकगणेशोत्सवातील पत्रीपासून आरोग्यवर्धक उत्पादनाची प्रात्यक्षिके

गणेशोत्सवातील पत्रीपासून आरोग्यवर्धक उत्पादनाची प्रात्यक्षिके

• निसर्गमित्र परिवारातर्फे ‘आरोग्यदायी गणेशोत्सव’ संकल्पना
कोल्हापूर :
येथील निसर्गमित्र परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्ष २०२५ व ‘आरोग्यदायी गणेशोत्सव’ या संकल्पनेतून उत्सवात वापरुन झालेल्या विविध वनस्पतींपासून सहजरित्या तयार होणाऱ्या आरोग्यदायी उत्पादनांचे प्रात्यक्षिक मुंबई येथील बायोटेक्नॉलॉजी शास्त्रज्ञ डॉ. मेघा शिंगे यांनी सादर केले.
यामध्ये घरच्याघरी कुंकू, अष्टगंध व गुलाल तयार करणे. तेरडा (गौरीची फुले/पाने) यापासून मेहंदी व उटणे, द्रोणपुष्पीचा (शंकरोबा) साबण, पानवेलीचे (खाऊची पाने) सरबत, नारळाच्या शेंडीपासून दैनंदिन वापराच्या विविध वस्तू, निर्माल्यातील फुलांचा धूप, घरच्याघरी बायोएझाईम व शाम्पू तयार करणे याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. याबरोबर महिलांसाठी घरगुती व्यवसायातून रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने आळंबी उत्पादनाचे प्रशिक्षणही देण्यात आले.
यावेळी वनस्पती अभ्यासक प्रा. सोहम हळदीकर यांनी गणेश उत्सवात वापरल्या जाणाऱ्या २१ पत्रींची शास्त्रीय माहिती व त्याचे उपयोग याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी निसर्गमित्र परिवारचे अनिल चौगुले यांनी यावर्षी गणेशोत्सव आरोग्यदायी व निसर्गस्नेही करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे असे सांगून, उत्सवात वापरुन झालेल्या पत्री, फुले आणि वनस्पती विसर्जन कुंडात, नदी-ओढ्यात न टाकता त्यापासून उपयुक्त वस्तू तयार कराव्यात तसेच यापासून व्यवसाय निर्मितीही होऊ शकते असे प्रतिपादन केले.
आपल्या सण-उत्सवात वापरल्या जाणाऱ्या विविध वनस्पतींचे संवर्धन होणे गरजेचे असून त्यासाठी आदर्श सहेली मंचच्या माध्यमातून रोपनिर्मिती सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकाने उत्सवात लागणाऱ्या वनस्पतींची आपल्याकडे उपलब्ध जागेत किंवा कुंड्यांमध्ये लागवड करून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यशाळेत सुमारे ४० महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे प्रास्ताविक राणीता चौगुले यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत ज्ञानदेव चौगुले आणि सौ. सुलभा मिरजकर यांच्या हस्ते निसर्ग विषयक पुस्तक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन आशा चौगुले, सिमा चौगुले, मीनल भोसले, पराग केमकर, अस्मिता डोंगरे, पल्लवी चौगुले यांनी केले. आभार सीमा जोशी यांनी मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
46 %
2.1kmh
0 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
26 °

Most Popular

You cannot copy content of this page