Homeसामाजिकनियमांचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करा

नियमांचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करा

• जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन
कोल्हापूर :
नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक पद्धतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
शांतता व दक्षता समिती सदस्य तसेच गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा कोल्हापूर जिल्ह्याने आजवर जपला आहे. नियमांचे पालन करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासह विविध सामाजिक संदेशावर आधारित देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही याची दक्षता घेऊन तसेच कोणतेही गालबोट लागू न देता हा उत्सव आनंदाने साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील तरुण, तरुणी, महिला व नागरिकांच्या उपस्थितीने मोठ्या गर्दीत पण कायद्याच्या चौकटी पाळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करुया, असे आवाहन करुन समिती सदस्य व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘गणराया अवॉर्ड’ यावर्षीपासून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले.
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी विभागनिहाय निधी वाटप करण्यात येत असून पाऊस थांबल्यावर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात येतील. गणेशोत्सव व मिरवणूक काळामध्ये विद्युत व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले जाईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. सामाजिक बदल घडवणे ही आव्हानात्मक बाब असली तरीही कोल्हापुरात मात्र असे बदल घडल्याचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव व अन्य उपक्रमातून दिसून आले आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर..’ चा संदेश देशाला कृतीतून देऊया आणि चित्रनगरीसाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूर शांततानगरी असल्याचे दाखवून देऊया, असे आवाहन श्री. कार्तिकेयन यांनी केले.
सीपीआरचे हृदयविकार विभागप्रमुख डॉ. अक्षय बाफना तसेच कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले, हृदय, कान व डोळे हे शरीराचे अत्यंत महत्वाचे अवयव आहेत. या अवयवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मानवी आरोग्यासाठी गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक तसेच अन्य सण समारंभा दरम्यान आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. तसेच लेझरचा वापर अत्यंत हानिकारक असून तो टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
शांतता व दक्षता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. सूत्रसंचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक खानापूरे यांनी केले. आभार पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page