कोल्हापूर :
२३ जुलै २००९ रोजी कोल्हापुरात भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने गेल्या १५ वर्षात शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सौ. वैष्णवी महाडिक, सौ. अंजली महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, शरयू भोसले उपस्थित होत्या.
भागीरथी महिला संस्थेच्या या प्रेरणादायी वाटचालीबद्दल बोलताना सौ. अरूंधती महाडिक म्हणाल्या की, महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली. भागीरथी महिला संस्थेने गावागावात बचत गटाच्या महिलांना एकत्र केले आणि महिला सबलीकरणाच्या प्रवासाला सुरवात झाली. गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले आहे.
सौ. महाडिक म्हणाल्या की, महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, या हेतूने भागीरथी महिला संस्थेच्यावतीने गेल्या १५ वर्षात शेकडो प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अंतर्गत महिलांना विविध प्रकारचे मसाले, इन्स्टंट पीठे, डोश्याचे प्रकार, कांदा लसून चटणी, वेगवेगळ्या चटण्याचे प्रकार, केक, बिस्किटे, खाद्य पदार्थ, चौपाटी पदार्थ, शिवणकाम, कापडी पिशवी, कागदी पिशवी, मेहंदी, क्लोथ पेंटिंग, राखी बनवणे, गणपती तयार करणे, गणपतीचे डेकोरेशन, बाथ सोप, नीळ, फिनेल, सोप, अगरबत्ती, कापूर, पणत्या, खत निर्मिती, नैसर्गिक कलर, योग प्रशिक्षण, लेझीम प्रशिक्षण, मेणबत्ती, अगरबत्ती, मेणाचे डिझाईन, पणत्या, सेंट व रूम फ्रेशनर, फिनेल व बॉबीन्स उद्योग, जरीअरी, द्रोण-पत्रावळी बनवणे, पर्सेस तयार करणे, फोटो लॅमिनेशन, पापड, लोणची, मसाला, स्क्रीन प्रिंटींग, फॅशन डिझाईनिंग कोर्स, ब्युटी पार्लर्स बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स, असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षणामध्ये शेळीमेंढी पालन, कुक्कुटपालन, व्यावसायिक शेती, गांडूळ खत, गायी, म्हैशी पालन इत्यादी व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.
१५ वर्षात ४ लाख महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याबरोबरच मार्केटिंगची देखील सोय उपलब्ध करुन दिली. त्यासाठी भिमा कृषी प्रदर्शन मध्ये मोफत स्टॉल, वेगवेगळ्या संस्थाच्या प्रदर्शनात आणि बिझनेस एक्स्पोमध्ये सहभागी करून महिलांना अर्थाजर्नाचा राजमार्ग खुला करण्यात आला.
त्याचप्रमाणे समाजात गुन्हेगारी किंवा अन्य कारणांमुळे तुरुंगवास भोगणार्या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेच्यावतीने समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी मोफत आरोग्य आणि उपचार शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये घरेलू मोलकरीण, हमाल, बांधकाम मजूर, फेरीवाले, रिक्षावाले, ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय अशा तब्बल ७ लाख विविध क्षेत्रातील नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात आले.
भागीरथी महिला संस्थेच्यावतीने आतापर्यंत १५०० हून अधिक योग शिबिरे घेण्यात आली. त्यातून समाजाच्या आरोग्यदायी भविष्याकडे कृतीशिल पावले उचलण्यात आली. संस्थेचा आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे संस्थेच्यावतीने फक्त महिलांसाठी रक्तदान शिबीरे घेण्यात आली. या उपक्रमांतर्गत ६०० शिबिरे घेतली असून त्यामध्ये ७ हजार बाटल्या रक्त संकलन झाले. तसेच जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी मदतीचा हात देऊन, स्वयंरोजगाराचा मंत्र देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, शेळी वाटप हा उपक्रम राबवण्यात आला. या शेळ्यांचा वार्षिक विमाही उतरवण्यात येत आहे.
रोजच्या व्यापातून बाहेर पडून महिलांनी हे जग पहावे, यासाठी ३०५ महिलांच्या सहभागातून सहलही काढण्यात आली. महिलांना दिल्लीमध्ये नेवून संसदीय कार्याची माहिती देण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथल्या माणदेशी संस्थेला भेट देवून महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची, व्यवसाय प्रशिक्षणाची आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
भागीरथी संस्थेच्या अत्यंत महत्वांकाक्षी आणि प्रचंड गौरवलेला उपक्रम म्हणजे कळी उमलताना. वयात येणार्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांबाबत मार्गदर्शन करणारा, कळी उमलताना हा उपक्रम शहर आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयात राबवत त्यांना निरोगी आयुष्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर १ लाख ४७ हजार किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व समजावून सांगून मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले.
अलिकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता, संस्थेच्यावतीने सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामध्ये १ लाख ७१ हजार महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आत्मरक्षणाचे धडे घेतले. संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यात भागीरथी ग्रंथालयाच्या २६ शाखा उघडून वाचन चळवळ गतीमान केली. तसेच काही वाचनालयांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्याची दखल घेत, भागीरथी ग्रंथालयाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हा सन्मान प्राप्त झाला.
महिलांना आर्थिक आणि कायदेशीर ज्ञान असणे आवश्यक झाले आहे. ही बाब लक्षात घेवून, ७ हजार महिलांना बँकेचे आणि कायद्याचे योग्य प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तर महिलांच्या मनोरंजनासाठीविविध स्पर्धा आणि चैत्रगौरी, हळदी-कुंकूसह उपक्रम गेल्या १५ वर्षापासून सातत्याने होत आहेत. या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ६० हजार महिला सहभागी झाल्या. आपल्या पारंपारिक लोककलांची जपणूक करण्यासाठी, भागीरथी महिला संस्थेतर्फे गेली १५ वर्षे भव्य प्रमाणात झिम्मा फुगडी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते. त्यामध्ये १ लाख २५ हजार महिला सहभागी झाल्या. तसेच महिलांसाठी कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच भागीरथीच्यावतीने अनेक प्रेरणादायी व्याख्यानं, मार्गदर्शनपर कार्यक्रम, यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. गरजू विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने १ लाख शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. तर ग्रामीण भागातील १२५ गरीब विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेमार्फत सायकल वाटप उपक्रम राबवण्यात आला. तसेच भागीरथी संस्थेच्या वतीने १०० गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. दुचाकीवरून प्रवास करणार्या ५०० महिलांना संस्थेच्या वतीने हेल्मेटचे वाटप केले. वृद्धाश्रमातील वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी मोफत कवळी वाटप आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले. तर गुणवंत आणि गरजू खेळाडूंना संस्थेच्यावतीने क्रीडा साहित्य आणि आर्थिक मदत करून त्यांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी संस्थेच्यावतीने २५ हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शहरातील विविध भाजी मंडई आणि श्री अंबाबाई मंदिरासह अनेक गर्दीच्या ठिकाणी कापडी पिशव्या मोफत देवून पर्यावरणाचा जागर करण्यात आला. तसेच गृहीणींना घरगुती ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी १ हजार घरांमध्ये खत बास्केटचे मोफत वाटप करण्यात आले.
महिला दिनानिमित महिलांसाठी मार्गदर्शन शिबीरे घेवून त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर नवरात्रीच्या काळात महिलांसाठी नवदुर्गा दर्शनाचा उपक्रमही संस्थेने पार पाडला आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी मोफत विमा योजना राबवण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी चारा आणि धान्य मदतीचा उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमी मध्ये शेणी दान उपक्रमही राबवण्यात आला. दरवर्षी जेलमधील बंदीजनांसाठी राख्या आणि कायदा सुव्यवस्था राखणार्या शहरातील पोलिसांना भागीरथी महिला संस्थेतर्फे राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
तसेच सीमेवरील जवानांसाठी अंध व्यक्तींकडून राख्या संकलित करून त्या पाठवण्याचा उपक्रम भागीरथी संस्थेने केला आहे.
१५ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना भागीरथी संस्थेने कार्यविस्तार आणि संस्था विस्तार केला आहे. त्याद्वारे भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचनालय, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था अशा नव्या संस्था उदयाला येवून उत्तम कारभार करत आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत सर्व वाटचालीमध्ये आणि उपक्रमांना खासदार धनंजय महाडिक यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. वेळोवेळी विविध कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदतही करून त्यांनी भागीरथी संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचं काम केले आहे. भविष्यात खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठबळावर आणि मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू राहणार आहे.
आता त्यापुढे एक पाऊल टाकून भागीरथी संस्थेने स्वतःची वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि युटयूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे महिलांचे प्रबोधन, त्यांचे सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती महिलांपर्यंत पोचवण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच या वर्षभरात महिलांसाठी आरोग्य विषयक, बौध्दीक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. जिल्ह्यातील महिलांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शनासाठी रवी पाटील ९६ ७३ ८१ ९२ ९२ किंवा भागीरथी पतसंस्थेच्या सुप्रिया चौगले यांच्या ८४० ९९ ७५० ५० या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन सौ. अरूंधती महाडिक यांनी केले.
भागीरथी संस्थेने महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवले : सौ. अरूंधती महाडिक
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
6.7kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°