कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी)ने ऊस शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे धोरण घेतले आहे. शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानापोटी बँकेने निव्वळ नफ्यातून तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्न करण्यासाठी बँकेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
बँकेच्यावतीने अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी जाहीर निवेदनाद्वारे आवाहन केले आहे की, ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञान वापरू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित साखर कारखान्याच्या सहमतीने तात्काळ बँकेकडे अर्ज करावेत. हे अर्ज करण्यासाठी येत्या महिनाभराची मुदत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दरवर्षी कमीत-कमी गाळप क्षमतेमुळे आणि एकरी उत्पादनामधील घटीमुळे शेतकऱ्यांचे व साखर कारखानदारीचे फार मोठे नुकसान होत आहे. ऊस शेती किफायतशीर होऊन गाळप हंगाम जास्त दिवस चालवायचा असेल तर; उसाचे एकरी उत्पादन वाढ करणे हे अपरिहार्यच आहे. हे ओळखून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या निव्वळ नफ्यामधून रु. एक कोटीची तरतूद ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले होते.
एकरी ऊस उत्पादनामध्ये क्रांतीकारक वाढ करण्याचा प्रयोग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट- पुणे, कृषी विज्ञान केंद्र- बारामती यांनी ए. आय. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर यशस्वी करून दाखविला आहे. शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरले तर या तंत्रज्ञानाने सुरू लागण ऊस उत्पादन एकरी १२५ टन होऊ शकतं, हे गेली दोन वर्ष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच; आडसाली लागणीचे उत्पादन एकरी १५० टन होऊ शकते, असे निष्कर्ष आलेले आहेत.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच व्ही. एस. आय. च्यावतीने राज्यातील सर्वप्रथम नोंदणी करणाऱ्या दहा हजार शेतकऱ्यांना या रकमेचे अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतर ते अनुदान बंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित साखर कारखान्याच्या सहमतीसह लवकरात लवकर अर्ज द्यावेत. त्यामुळे; ही रक्कम शेतकऱ्यांना देणे सुलभ होईल, असे आवाहन केडीसीसी बँकेने जाहीर निवेदनाद्वारे केले आहे. यासंबंधीचे विशिष्ट नमुन्यातील अर्ज गावोगावच्या विकास सेवा संस्थांमधून उपलब्ध होणार आहेत.
———
अशी असेल अनुदान योजना…
व्ही.एस.आय.ने हेक्टरी रू. २५ हजार खर्च निश्चित केला आहे. यापैकी, रू. ९,२५० अनुदान व्ही.एस.आय.कडून मिळणार आहे. संबंधित साखर कारखान्याकडून रू. ६,७५० व शेतकऱ्याचा हिस्सा रू. नऊ हजार आहे. दरम्यान, ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञान वापरू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी जर बँकेकडे अर्ज केला आणि बँकेने तो मंजूर केला तर शेतकऱ्यांच्या हिश्शापोटीची ही रक्कम बँकेने भरण्याचे धोरण बँकेने ठरविलेले आहे. तात्काळ जे शेतकरी या व्ही.एस.आय.च्या योजनेमध्ये सहभागी होणार असतील आणि जे साखर कारखाने शेतकऱ्यांना आपल्या या योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार असतील तर शेतकऱ्यांच्या वाट्याचा जो हिस्सा आहे तो बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्या हिश्शापोटी अनुदान स्वरूपात भरला जाणार आहे.
——————————————————-
केडीसीसी बँक ऊस शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराकरिता देणार अनुदान
Mumbai
mist
29
°
C
29
°
28.9
°
84 %
3.1kmh
75 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°