• शैक्षणिक व आरोग्य संशोधन आणि सेवांविषयक आदानप्रदान होणार
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील शिक्षण संस्था यांच्यादरम्यान शनिवारी शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांतील संशोधन आणि सेवा यांचे आदानप्रदान करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील रिसर्च सेंटर व हॉस्पिटल यांच्या दरम्यान पाच वर्षांपूर्वी आरोग्य सेवांचे आदानप्रदानविषयक सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराची यशस्विता पाहून आता त्याची व्याप्ती वाढवित डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेसमवेत पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. शनिवारी या करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील शिक्षण संस्था या दोहोंची शैक्षणिक व संशोधकीय प्रगती एकसारख्या गतीने सुरू आहे. पूर्वीच्या सामंजस्य कराराचा दोन्ही बाजूंना अतिशय चांगला लाभ झाला आहे. कराराची व्याप्ती वाढल्यामुळे येथून पुढील काळात वैद्यकीय सेवांच्या पलिकडे इतरही विविध विभागांमध्ये सहकार्यवृद्धी करता येणे शक्य होईल. विद्यार्थ्यांचे आदानप्रदानही सुलभ होईल. परस्पर सहकार्यातून आपण एकत्रित वृद्धिंगत होऊ, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या सामंजस्य कराराची व्याप्ती आता व्यक्तींकडून संस्थांकडे सरकली आहे. शिवाजी विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र, मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटपासून ते सामाजिक कार्यापर्यंत असे अनेक अभ्यासक्रम आहेत, जे वैद्यकीय क्षेत्राला पूरक आणि उपयुक्त आहेत. त्यामधील संशोधकांमध्ये विचारांची आणि संशोधनकार्याची देवाणघेवाण तसेच सहकार्य निर्माण व्हायला हवे. दोन्ही संस्थांतील विविध विषयतज्ज्ञांमध्ये संवाद प्रस्थापित झाला पाहिजे.
यावेळी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे यांनी मागील पाच वर्षांतील सामंजस्य कराराच्या फलश्रुतीविषयी सविस्तर माहिती दिली. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वाक्षरी केल्या. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालक डॉ. शिंम्पा शर्मा, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉ. राजेश कल्लाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव डॉ. संजय जाधव, विश्वजीत खोत, विनोद पंडित आदी उपस्थित होते.
——————————————————-
शिवाजी विद्यापीठाचा डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेसमवेत महत्त्वपूर्ण करार
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3
°
C
28.3
°
28.3
°
79 %
6.7kmh
98 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°