Homeशैक्षणिक - उद्योग गांडूळ खत निर्मिती शेतीसाठी पूरक  व्यवसाय : डॉ. रवींद्र बकरे

गांडूळ खत निर्मिती शेतीसाठी पूरक  व्यवसाय : डॉ. रवींद्र बकरे

कोल्हापूर :
गांडूळ खत निर्मिती हा शेतीसाठी पूरक तसेच पर्यावरणपूरक व्यवसाय असून तो शाश्वत शेतीकडे जाण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे, असे प्रतिपादन प्राणिशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र बकरे यांनी केले.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित ‘वर्मिकल्चर’ या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, डॉ. अश्विनी शेवाळे, प्रा. राहुल तायडे यांची उपस्थिती होती.
डॉ. रवींद्र बकरे यांनी गांडूळ पालनाची वैज्ञानिक प्रक्रिया स्पष्ट करताना सांगितले की, शेतीतील अवशेष, घरगुती अन्नकचरा व इतर सेंद्रिय कचऱ्याचे रूपांतर पोषक तत्त्वांनी समृद्ध कंपोस्टमध्ये केले जाते. या कंपोस्टला “काळे सोने” असेही म्हटले जाते. हे मातीचे आरोग्य, सुपीकता आणि शेतीतील उत्पादनक्षमता लक्षणीयरीत्या वाढवते. रासायनिक शेतीमुळे होणारे मातीचे नुकसान व प्रदूषण हे गंभीर असून, त्यातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गांडूळ खताचा वापर हा एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. गुरुनाथ फगरे यांनी भेसळयुक्त व रसायनयुक्त अन्नपदार्थांचा मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम सविस्तर स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, बाजारातील अन्नपदार्थांमध्ये कीटकनाशकांचे अंश, रासायनिक खतांचे अतिरेकी प्रमाण आणि भेसळीमुळे गंभीर आरोग्य समस्या वाढत आहेत. या समस्यांचे मूळ कारण म्हणजे रासायनिक शेती व खतांचा अतिरेकी वापर असल्याचे त्यांनी नमूद केले. सेंद्रिय शेती, वर्मी कंपोस्टिंग आणि नैसर्गिक खतांचा वापर हा काळाची गरज असल्याचे सांगितले. गांडूळ खतामुळे मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढून सुपीकता व पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा होते असे त्यांनी स्पष्ट केले. हे खत मानवी आरोग्यास सुरक्षित असल्यामुळे भविष्यातील शेती विकासासाठी उपयुक्त असल्याचेही सांगितले.
प्रास्ताविकामध्ये प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगताना वर्मी कल्चर आणि वर्मी कंपोस्टिंग यातील फरक स्पष्ट केला. त्यांनी वैज्ञानिक संकल्पना, पद्धती व त्यांच्या प्रत्यक्ष उपयोगांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, वर्मी कंपोस्टिंगचा कृषी क्षेत्रातील आर्थिक व पर्यावरणीय परिणाम याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.
पाहुण्यांची ओळख प्रा. राहुल तायडे यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. ज्योती घाडगे व डॉ. अश्विनी शेवाळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. शरद चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. राहुल तायडे, डॉ. अश्विनी शेवाळे, प्रा. ज्योती घाडगे व प्रा. शरद चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
2.6kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page