Homeकला - क्रीडारंकाळा तालीमची विजयी सलामी तर पीटीएम - सम्राटनगर बरोबरी

रंकाळा तालीमची विजयी सलामी तर पीटीएम – सम्राटनगर बरोबरी

• शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. रंकाळा तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळवर टायब्रेकरमध्ये मात करून विजयी सलामी दिली. विजयामुळे रंकाळा तालीम मंडळला तीन गुण प्राप्त झाले. पीटीएम अर्थात पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस् यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगने सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामाचा शुभारंभ झाला. स्पर्धेचे उदघाटन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, होम डीवायएसपी तानाजी सावंत, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून झाले. याप्रसंगी केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, उपाध्यक्ष बाळ निचिते, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, प्रा. अमर सासने, नंदकुमार बामणे, तेज घाटगे, अभिषेक मोहिते, अजित जाधव, संभाजी मांगोरे – पाटील, विश्वंभर मालेकर, मनोज जाधव, दीपक घोडके, प्रदीप साळोखे, श्रीनिवास जाधव, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.
रंकाळा तालीम विजयी…
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात रंकाळा तालीम मंडळने संध्यामठ तरुण मंडळवर टायब्रेकरमध्ये ४ विरुध्द २ गोलने मात करून विजयी सलामी दिली. सामना पूर्णवेळेत २-२ गोल बरोबरीत होता.
चुरशीने झालेल्या या सामन्यात कपील शिंदेने ३१व्या मिनिटाला गोल नोंदवून संध्यामठला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३५व्या मिनिटाला अभिजीत साळोखेने गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. उत्तरार्धात रंकाळा तालीमकडून पी. सी. कृष्णराजने गोल करून ४२व्या मिनिटाला आघाडी कमी केली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात झालेल्या चढाईत स्वयंगोल झाला आणि सामना २-२ असा बरोबरीत राहिला.
सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये संध्यामठकडून आशिष पाटील, मसूद मुल्ला, अमोल पाटील यांनी गोल केले तर कपील शिंदे व विक्रम शिंदे यांचे फटके वाया गेले. रंकाळा तालीमच्या सोहम निकमचा फटका वाया गेला. त्यानंतर सौरभ मोहिते, गोविंदा दासार, पी.सी. कृष्णराज व इतिफाक आझाद यांनी अचूक गोल नोंदवून ४ विरुध्द २ गोलने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पीटीएम – सम्राटनगर बरोबरी…
दुपारच्या सत्रातील पीटीएम अर्थात पाटाकडील तालीम मंडळ (अ) आणि सम्राटगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना चुरशीचा झाला. यामध्ये सम्राटनगरने तोडीसतोड खेळ करून पाटाकडील (अ)ला विजयापासून रोखले. पूर्वार्धात सम्राटनगरने वेगवान चढाया करून खेळावर वर्चस्व ठेवले तर उत्तरार्धात पाटाकडील (अ)ने खोलवर चाली रचून गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. सम्राटनगरचा गोलरक्षक ओमकार माने याने उत्कृष्ट गोलरक्षक करून अनेक चढाया फोल ठरविल्या. सम्राटनगरच्या ओमकार जाधव, असिल बागवान, शरण ॲन्थोनी, मोहित घोरपडे, यासिन नदाफ यांनी उत्कृष्ट खेळ केला. पाटाकडील (अ)कडून ओमकार मोरे, प्रतिक बेदामे, प्रथमेश हेरेकर, कुपीन्दर पवार, महम्मद सावाद, नबी खान यांनी वेगवान चढाया करून गोलचे प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. अखेर पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
——————————————————-
    आजचे सामने…
• झुंजार क्लब – सुभाषनगर : दु. १:३० वा.
• खंडोबा – बालगोपाल : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
29 %
2.6kmh
0 %
Mon
31 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page