Homeराजकियशिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार

शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार

• समविचारी नेत्यांना सोबत घेणार : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर :
शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील आणि स्व. दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या कुटुंबीयांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले. या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांच्यासोबत ताकदीने लढवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करू, असा विश्वास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ येथे व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे आ. सतेज पाटील यांनी शिरोळ, जयसिंगपूर, नगरपरिषद आणि तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. यावेळी ते बोलत होते.
आ. सतेज पाटील पुढे म्हणाले की, सरकारने मतदारयादीत घोळ निर्माण केला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी याबाबत दक्ष राहिले पाहिजे. उशिरा का होईना पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपली सत्ता येण्यासाठी आजपासूनच प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे. शिरोळ तालुक्यात सत्ता खेचण्यासाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. उल्हास पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह समविचारी नेत्यांच्या सोबतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका आपण ताकदीने लढवून पुन्हा एकदा शिरोळ तालुक्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी रात्रीचा-दिवस करावा.
प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सत्ता आपली येण्यासाठी इच्छुकांनी सुद्धा दोन पावले मागे येऊन जो उमेदवार निश्चित होईल, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. आम्ही सर्व नेतेमंडळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. येत्या चार दिवसात सर्व नेतेमंडळींच्या उपस्थितीत तालुक्यात मोठा मेळावा घेऊन आपली भूमिका मांडू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहे. माजी खा. राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. माजी आ. उल्हास पाटील यांनाही सोबत घेऊन ही निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल. आपली सत्ता येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. येत्या चार दिवसात तालुकास्तरीय मेळावा घेऊन या निवडणुकीची दिशा स्पष्ट केली जाईल. आजपासूनच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी.
यावेळी पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत सत्ता येण्यासाठी एकदिलाने काम करणार आहोत. कार्यकर्त्यांनीही आजपासूनच निवडणुकीच्या कामाला सुरुवात करून विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी व इच्छुक उमेदवारांनी आमदार सतेज पाटील, सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडली‌. दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आभार मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
40 %
3.6kmh
100 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page