Homeकला - क्रीडा१ डिसेंबरला फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ

१ डिसेंबरला फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ

• शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगने होणार प्रारंभ
कोल्हापूर :
फुटबॉल संघ व खेळाडूंसह तमाम फुटबॉलप्रेमींना नव्या फुटबॉल हंगामाच्या ‘किक-ऑफ’ची आस लागून राहिली होती, ती आता थोड्याच दिवसांत पूर्ण होणार आहे. १ डिसेंबरला सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ होत आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)ने शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वरिष्ठ गटातील या स्पर्धेने फुटबॉल हंगामाला प्रारंभ होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर १ डिसेंबरला दुपारी १:३० वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ तर दुपारी ४ वाजता पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस् या सामन्याने हंगामाचा किक-ऑफ होईल.
केएसए ए डिव्हिजन अंतर्गत संघ व खेळाडू नोंदणी पूर्ण झाल्यावर येथील फुटबॉलशौकिनांना वेध लागतात ते स्थानिक फुटबॉल हंगामाचे. कोल्हापूर व फुटबॉलचं नातं अतूट आहे. येथील पेठापेठांत फुटबॉलचे संघ संस्थान काळापासून आकाराला आले आणि फुटबॉल हा प्रत्येकाच्या नसानसात भिनत गेला. राजाश्रय लाभलेल्या फुटबॉल खेळाला नंतर लोकाश्रय वाढतच गेला आणि येथील फुटबॉल लोकप्रिय झाला. कोल्हापूरकरांनी कुस्तीनंतर सर्वाधिक प्रेम केलं ते फुटबॉल या खेळावर! जिद्द, ईर्षा व चिकाटीने हा खेळ बहरत गेला. येथील खेळाडूंमधील गुणवत्ता सातत्याने झळकत असते. हंगामात होणाऱ्या सर्वच फुटबॉल स्पर्धांना फुटबॉलप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळतो.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्याने फुटबॉलप्रेमींना १ डिसेंबरपासून फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, कोणत्या संघ सरस कामगिरी करणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. देशभरातील खेळाडूंसह स्थानिक खेळाडूंचा खेळ कसा होणार आणि कोण चमकदार कामगिरी करणार, याची उत्सुकता फुटबॉलप्रेमींना आहे.
वरिष्ठ गटातील सोळा संघात साखळी स्पर्धा होईल. स्पर्धेत सिनिअर सुपर ८ आणि सिनिअर ८ अशा दोन गटांतर्गत एकूण सात फेऱ्यांमध्ये ५६ सामने खेळले जातील. सिनिअर सुपर- ८ आणि सिनिअर- ८ अशा दोन गटांतर्गत होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झाली आहे. लीग चॅम्पियन होण्यासाठी सिनिअर सुपर ८ गटात चुरस असेल. सर्वाधिक गुण मिळवून कोणता संघ ‘चॅम्पियन’ ठरणार हे आता सुरू होणाऱ्या स्पर्धेत स्पष्ट होईल.
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर होतील. दररोज दोन सामने खेळले जातील. पहिला सामना दुपारी १:३० वाजता तर दुसरा सामना दुपारी ४ वाजता सुरू होईल. पहिल्या फेरीतील सामने पुढीलप्रमाणे आहेत.
• १ डिसेंबर : संध्यामठ – रंकाळा
पाटाकडील (अ) – सम्राटनगर
• २ डिसेंबर : झुंजार क्लब – सुभाषनगर
खंडोबा – बालगोपाल
• ३ डिसेंबर : फुलेवाडी – प्रॅक्टीस क्लब
शिवाजी – वेताळमाळ
• ४ डिसेंबर : उत्तरेश्वर – पाटाकडील (ब)
जुना बुधवार – दिलबहार
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
64 %
2.1kmh
7 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page