Home Blog

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान

0
  • मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

कोल्हापूर :
लाखो रूग्णांपर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आणि अत्याधुनिक उपचारांद्वारे आरोग्य सेवक लेखनीय योगदान देणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी केंदीय मंत्री पटेल यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या ८व्या ‘हेल्थ केअर समिट’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बाजार समित्यांनी पायाभूत सुविधांवर भर देण्याची गरज : डॉ. सुभाष घुले

कोल्हापूर :
बाजार समितीमध्ये शेतकरी केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यावा, बाजार समित्यांचे उत्पन्न वाढवण्याबाबत प्रयत्न करावेत, प्रत्येक बाजार समितीमध्ये ई वाचनालय सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर पणन विभागीय कार्यालयाचे उप सरव्यवस्थापक डॉ. घुले यांनी सूचित केले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांच्यासाठी हॅाटेल द फर्न, कोल्हापूर येथे पणन विषयक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेचे उदघाटन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास सर्व बाजार समिती सभापती, डॉ. सुभाष घुले, तात्यासाहेब मुरुडकर व सहकारी अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करुन करण्यात आले. डॉ. घुले यांनी आयोजित कार्यशाळेची प्रस्तावना करुन पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी तुळशीदास रावराणे सभापती सिंधुदुर्ग, सुरेश सावंत सभापती रत्नागिरी, सुरेश पाटील सभापती वडगाव पेठ, प्रकाश देसाई सभापती कोल्हापूर, रामदास पाटील सभापती गडहिंग्लज, अण्णा पानदारे सभापती जयसिंगपूर, सूर्यकांत पाटील, नामदेव परीट, उपसंचालक कृषी, तात्यासाहेब मुरूडकर सहकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय कोल्हापूर, अच्चुत सुरवसे, डीएमआय, पणन मंडळाचे अधिकारी यतीन गुंडेकर, शेखर कोंडे, अनिल जाधव, किरण जाधव, ओंकार माने, नवनाथ मोरे व कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे पदाधिकारी, सचिव उपस्थित होते.
श्री. परीट यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारी कृषी उत्पादने व त्यावरील नियमनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्र शासनाच्या डीएमआयचे अधिकारी श्री. सुरवसे यांनी डीएमआयच्या बाजार समिती व शेतकरी यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.श्री. कोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भुये येथील भैरोबा माळावर वृक्ष लागवड मोहीम उत्साहात

0

कोल्हापूर :
भुये व भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समिती यांच्यावतीने रविवारी वृक्ष लागवड मोहीम उत्साहात पार पडली. भुये येथील भैरोबा माळावर या मोहिमेला निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी आणि भैरोबाभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश दिला गेला.
या उपक्रमात सहभागी झालेले वृक्षप्रेमी स्वतः एक देशी झाड घेऊन आले होते व ते झाड स्वतः लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. यावेळी वड, पिंपळ, लिंब, करंज, म्हाळुंग, कवठ, चिंच, जांभूळ, सीताफळ, रामफळ, आंबा, पिपरणी, नारळ, लिंबू, पारिजातक व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक झाडाचे संरक्षण व संगोपन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
भैरोबा वृक्ष संवर्धन समिती भुये या समितीचे समन्वयक अमर पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यावर शेकडो नागरिकांनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहून उपक्रमात सहभाग घेतला.
याप्रसंगी भुये गावचे माजी सरपंच अभिजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगुले, दिपक पाटील, अमर मिसाळ, शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, अमित पाटील, अरुण पाटील, प्रमोद माने, संपत पाटील, सर्जेराव पाटील, संजय पाटील, विकास पाटील, संतोष मानकापुरे, संभाजी पाटील (भुयेवाडीकर), तानाजी पाटील, देव पाटील, प्रदीप पाटील, आश्लेश खाडे, रामभाऊ पाटील, संपत पाटील, प्रणव पाटील, युवराज तळेकर, यशराज पाटील, रोहित पाटील, प्रथमेश पाटील, निलेश पाटील, सचिन पाटील, पार्थ पाटील, अथर्व पाटील, कान्होजी स्वामी, केदार पाटील, सुभाष साळोखे, दिनकर पाटील, दीपक शिंदे, शामराव पाटील, विष्णुपंत पाटील, केवल पाटील आणि हलगीसम्राट भार्गव आवळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीबीजी कोल्हापूर टस्कर्सची रायगड रॉयल्सवर मात

कोल्हापूर :
कर्णधार राहुल त्रिपाठी (नाबाद)ने केलेल्या सुरेख फलंदाजीसह आनंद ठेंगेने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा २ गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. राहुल त्रिपाठीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धा गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्सच्या आनंद ठेंगे (४-२९), दिपक डांगी (३-२७), आत्मन पोरे (२-३१) यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्सचा डाव १९.४ षटकात सर्वबाद १५९ धावांवर संपुष्टात आला. विकी ओस्तवाल (२२) व सिद्धेश वीर (२१) यांनी २२ चेंडूत ३९ धावांची सलामी दिली. कोल्हापूरच्या आनंद ठेंगेने या सलामी जोडीला झेल बाद केले. नीरज जोशीने २७ चेंडूत १ चौकार व ५ षट्काराच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक एक धावेने हुकले. ओंकार खाटपे १६, हर्ष मोगावीरा १०, ऋषभ राठोड १० यांच्या धावा वगळता तळातील फलंदाज दुहेरी खेळी करू शकला नाही.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाला विजयासाठी १६० धावांचे आव्हान होते. अंकित बावणे व सचिन धस या जोडीने २४ चेंडूत ४२ धावांची भागीदारी करून सुरेख सुरुवात करून दिली. सचिन धस २९ धावा, तर अंकित बावणे १५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे (०)ला तनय संघवीने पायचीत बाद केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या कर्णधार राहुल त्रिपाठीने ४३ चेंडूत ५३ धावांची आक्रमक खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यात त्याने ५ चौकार मारले. राहूल त्रिपाठी व विशांत मोरे (२२) यांनी सहाव्या विकेटसाठी ३० चेंडूत ४९ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. शेवटच्या ६ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर धनराज शिंदेने एक धाव घेतली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेऊन हे आव्हान २ चेंडूत ३ धावा असे कमी केले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर अतिरिक्त धावा कोल्हापूर संघाला मिळाल्या व कोल्हापूर टस्कर्स संघाने हे आव्हान २० षटकात ८ बाद १६२ धावा करून पूर्ण केले.

शिवाजी विद्यापीठात ‘सायन्स बिहाइंड स्पोर्ट्स’ या विषयावर चर्चासत्र

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे रविवारी क्रीडापटूंसाठी स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या माध्यमातून स्टॅमिना, रिकव्हरी, फोकस आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी ‘सायन्स बिहाइंड स्पोर्ट्स’ या विषयावर विशेष एकदिवसीय चर्चासत्र यशस्वीरित्या संपन्न झाले. या चर्चासत्राला क्रीडापटूंचा उत्साही प्रतिसाद लाभला.
या चर्चासत्राच्या उदघाटन कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर आणि क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पवार, डॉ. धनंजय पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी खेळाडूंना स्पोर्ट्स सायन्स व क्रीडा क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी विद्यापीठामार्फत उपलब्ध असल्याचे सांगितले. खेळाडूंच्या आयुष्यात विज्ञानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
सिद्धार्थ शिंदे यांनी खेळाडूंना देशाचे नाव उंचावण्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन केले तसेच डोपिंगपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला.
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, सोई सुविधा व बी ए स्पोर्ट्स अभ्यासक्रमाची माहिती दिली.
क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ अनघा देशपांडे यांनी स्पोर्ट्स सायकोलॉजी या विषयाचे महत्व पटवून दिले आणि मानसिक तणावातून बाहेर कसे पडायचे आणि उत्तम कामगिरी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले.
आहार तज्ज्ञ ऋषिकेश जांभळे आणि शुभम आगळे यांनी ‘स्पोर्ट्स ॲन्ड न्यूट्रिशन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा शिंदे यांनी केले तर सुचय खोपडे यांनी आभार मानले. चर्चासत्रास खेळाडू,पालक, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डब्लूएमपीएल स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्सचा अंतिम फेरीत प्रवेश

0

कोल्हापूर :
         महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित डब्लूएमपीएल स्पर्धेत ईश्वरी सावकार (७८धावा), ईश्वरी अवसरे (५२धावा) यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ३० धावांनी पराभव केला. सोलापूर स्मॅशर्स संघाने गुणतालिकेत ४ विजय, १ पराभवसह दुसरे स्थान कायम राखत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सामनावीरचा बहूमान ईश्वरी सावकार हिला मिळाला.
          गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत साखळी फेरीत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर स्मॅशर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १६९ धावांचे आव्हान उभे केले. ईश्वरी सावकार व ईश्वरी अवसरे यांनी ७६ चेंडूत ९६ धावांची सलामी देत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. ईश्वरी सावकारने ५३ चेंडूत ७८ धावांची विक्रमी खेळी केली. याआधी ईश्वरी सावकाराने रत्नागिरी जेट्स विरुद्ध ७५ धावांची खेळी केली होती. तिला ईश्वरी अवसरेने ४४ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी करून साथ दिली. तिने ६ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचले. ईश्वरी अवसरेला १३व्या षटकात आदिती गायकवाडने पायचीत बाद केले. त्यानंतर ईश्वरी सावकारने शाल्मली क्षत्रिय (नाबाद ३२)च्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ७० धावांची भागीदारी करून संघाला १६९ धावांचे आव्हान उभारुन दिले. रायगड रॉयल्सकडून प्रज्ञा वीरकर (१-२३), आदिती गायकवाड (१-२७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत रायगडच्या जान्हवी वीरकरने दुसरे षटक निर्धाव टाकले.
       १६९ या आव्हानाचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघाला २० षटकात ९ बाद १३९ धावापर्यंत मजल मारता आली. पॉवरप्लेमध्ये किरण नवगिरे (१८), भाविका आहिरे (१०), श्रावणी देसाई (२) हे बाद झाल्याने रायगड रॉयल्स ३ बाद ४३ धावा अशा स्थितीत होता. त्यानंतर आयेशा शेखने एकाबाजूने लढताना २५ चेंडूत २ चौकार व ३ षटकारासह ४१ धावांची खेळी केली. तिला प्रज्ञा वीरकरने १६ धावा काढून साथ दिली. या जोडीने २६ चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली. सोलापूरच्या मुक्ता मगरेने आयेशा शेखला झेल बाद करून रायगड रॉयल्स अडचणीत टाकले. यशोदा घोगरे (१४), इशा पठारे (१३)ने थोडासा प्रतिकार केला. सोलापूर स्मॅशर्सकडून शरयू कुलकर्णी (२-२१), मुक्ता मगरे (१-६), गायत्री सुरवसे (१-१९), शाल्मली क्षत्रिय (१-१९) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांनी घेतली एकनाथ शिंदे

0

कोल्हापूर :
          कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे नूतन चेअरमन  नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी  बुधवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोकुळ परिवाराच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळ दूध संघाच्या विविध योजनांची व प्रलंबित विषयांची माहिती दिली.
        याप्रसंगी गोकुळ दूध संघाच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, सौरऊर्जा प्रकल्प, स्लरी प्रकल्प, वासरू संगोपन योजना, मुंबई, पुणे डेअरी विस्तार तसेच मुंबई येथील प्रलंबित भूखंडासंदर्भातील विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच यावेळी दुग्ध विकास मंत्री यांना गोकुळ भेटीचे निमंत्रण देण्यात आले.
       यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरात गोकुळ दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तेच्या माध्यमातून गोकुळने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला असून हा विश्वास कायम राखून संस्था अधिक ग्राहकाभिमुख व्हावी आणि बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करावे.
        दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आपली सांगितले की, दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गोकुळसारख्या नामांकित संस्थेला प्रलंबित विषयांवर शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
        यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते

जिओब्लॅकरॉकने केली आपल्या टॉप लीडरशिप टीमची घोषणा

0

कोल्हापूर :
         जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश करण्याआधीच आपल्या वरिष्ठ नेतृत्व टीमची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने आपली अधिकृत वेबसाईट आणि एक विशेष ‘अर्ली ऍक्सेस’ उपक्रम देखील सुरू केला आहे. मागील महिन्यातच कंपनीने सिड स्वामीनाथन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. जिओब्लॅकरॉक हे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिका स्थित ब्लॅकरॉक यांचा संयुक्त उपक्रम आहे.
         कंपनीने गौरव नागोरी यांची मुख्य परिचालन अधिकारी, अमित भोसले यांची चीफ रिस्क ऑफिसर, अमोल पई यांची चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि बिराजा त्रिपाठी यांची हेड ऑफ प्रॉडक्ट म्हणून नियुक्ती केली आहे.
        कंपनीने सांगितले की, जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटची टीम गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव, डिजिटल नवोन्मेष आणि ग्राहक-केंद्री उत्पादने यांचा संगम साधेल. कंपनीची ही अग्रगण्य टीम गुंतवणुकीचे स्वरूप बदलून ते लाखो लोकांसाठी अधिक सुलभ व परवडणारे बनवण्याच्या जिओब्लॅकरॉकच्या मिशनसाठी सज्ज आहे.
         जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सिड स्वामीनाथन म्हणाले की, जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटसाठी हा एक मैलाचा दगड आहे. आमची नेतृत्व टीम पारदर्शक व स्पर्धात्मक किंमत धोरणावर आधारित उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे. येत्या काही महिन्यांत कंपनी विविध गुंतवणूक पर्याय सादर करणार असून, त्यात डेटा-आधारित गुंतवणुकीत ब्लॅकरॉकची कौशल्ये वापरण्यात येणार आहेत.
          जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटने आपल्या वेबसाईटवर एक ‘एक्सक्लुझिव्ह अर्ली ऍक्सेस’ उपक्रम देखील जाहीर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत, लोकांना जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटच्या डिजिटल-प्रथम गुंतवणूक सेवांमध्ये स्वारस्य दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर, त्यांना गुंतवणुकीच्या मूलतत्त्वांवर आधारित माहिती व शैक्षणिक सामग्री प्राप्त होईल.
——————————————————- 

ललित गांधी इंटरनॅशनल स्कूल’चा शुभारंभ

0

कोल्हापूर :
         भविष्यातील कोल्हापूरची गरज ओळखुन सुरू केलेली ‘ललित गांधी इंटरनॅशनल स्कूल’ ही कोल्हापूरच्या शैक्षणिक विश्‍वातील नव्या अध्यायाची सुरूवात असेल असे प्रतिपादन महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. संस्थेतर्फे मेट्रो लाईफ सिटी या अत्याधुनिक टाऊनशीपमध्ये उभारण्यात आलेल्या ‘ललित गांधी इंटरनॅशनल स्कूल’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
         याप्रसंगी संस्थेचे सचिव महेश सामंत, महावीर स्कूल (माध्यमिक)च्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे, ब्लॉसम प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका निलम जाधव, महावीर स्कूल (प्राथमिक)च्या मुख्याध्यापिका विद्या सरमळकर, नवीन शाळेच्या डायरेक्टर मुक्ती ओसवाल, सौ. जया गांधी, हर्षिता भंडारी, भक्ती कटारीया, अ‍ॅड. मेघ गांधी, सौ. अनिता गांधी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला.
         ललित गांधी पुढे म्हणाले की, ३३ वर्षापूर्वी पहिली शाळा सुरू करताना सुसंस्कारासह दर्जेदार शिक्षण देण्याचे जे सेवाव्रत स्विकारले होते त्याच भावनेने आज सहावी शाळा सुरू करीत आहोत. ही शाळा इंटरनॅशनल स्कूल श्रेणीमध्ये सुरू करण्यामागची प्रेरणा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती आहेत. कोल्हापूरात आय.टी. क्षेत्रासह सर्वांगिण विकास अपेक्षित असेल तर अन्य सुविधांसह दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. त्यांना अपेक्षित गुणवत्तेचा दर्जा, क्रीडा सुविधांसह परिपुर्ण अशी इंटरनॅशनल स्कूल बनविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत अशी ग्वाही ललित गांधी यांनी याप्रसंगी दिली.
          सुसंस्कारासह गुणवत्तापुर्ण शिक्षणाबरोबरच, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस आदी सर्व प्रकारच्या क्रीडा प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केल्याचेही ललित गांधी यांनी सांगितले.
इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर सौ. मुक्ती प्रशम ओसवाल यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.

ईगल नाशिक टायटन्सची विजयी हॅटट्रिक

कोल्हापूर :
         एमपीएल स्पर्धेत सहाव्या दिवशी डावखुरा फिरकीपटू प्रशांत सोळंकी (४-१३) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह अर्शिन कुलकर्णी (४२ धावा व २-२७) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून विजयाची हॅटट्रिक नोंदविली.
         गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३४ धावा केल्या. अंकित बावणे ११ धावांवर बाद झाला. नाशिकच्या अर्शिन कुलकर्णीने कर्णधार राहुल त्रिपाठीला १५ धावांवर पाठोपाठ बाद केले. पॉवरप्लेमध्ये कोल्हापूर २ बाद ३३ अशा स्थितीत होता. सचिन धस (८), सिद्धार्थ म्हात्रे (२) हे फलंदाज झटपट बाद झाल्याने कोल्हापूर संघ अडचणीत आला. त्यानंतर विशांत मोरेने २१ चेंडूत १ चौकार व १ षटकारासह २२ धावा काढून बाद झाला. विशांत व श्रीकांत मुंढे यांनी पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूत २८ धावांची भागीदारी केली. श्रीकांत मुंढे २९ चेंडूत २७ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने एक चौकार मारला. १३व्या षटकात प्रशांत सोळंकीने श्रीकांत मुंढेला आक्रमक फटका मारताना त्रिफळा बाद केले. याच षटकात प्रशांत सोळंकीने धनराज शिंदे (२)ला झेलबाद करून वैयक्तिक दुसरा बळी टिपला. १४व्या षटकात नाशिकच्या अक्षय वैकरने श्रेयश चव्हाण (१)ला झेलबाद करून कोल्हापूर संघाला ७ बाद ८७ धावा असे अडचणीत टाकले. त्यानंतर आनंद ठेंगेने शेवटच्या काही षटकात आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवली. त्याने २० चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी करून कोल्हापूर टस्कर्स संघाला १३४ धावांचे आव्हान उभारून दिले.
        नाशिक टायटन्सकडून प्रशांत सोळंकी हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. प्रशांतने १३ धावात ४ विकेट घेतल्या. अर्शिन कुलकर्णीने २७ धावात २ गडी तर, अक्षय वैकर (१-१८), मनोज इंगळे (१-३२) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
          ईगल नाशिक टायटन्स संघाला विजयासाठी १३५ धावांचे आव्हान होते. हे आव्हान २० षटकात ६ बाद १३८ धावा करून पूर्ण केले. एमपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रजनीश गुरबानीने मंदार भंडारी (४)ला झेल बाद करून नाशिक संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शिन कुलकर्णी व साहिल पारीख यांनी दुसऱ्या विकेटसाठी २५ चेंडूत ३८ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. साहिल पारीख २७ धावा काढून तंबूत परतला. त्याने ४ षटकार मारले. अर्शिन व रोहन दामले यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाची पकड मजबूत केली. या भागीदारीमुळे नाशिक संघाने १०. १ षटकात धावांचे शतक गाठले. अर्शिनने ३४ चेंडूत शानदार ४२ धावा केल्या. त्यात त्याने १ षटकार व ३ उत्तुंग षटकार ठोकले. तर, रोहन दामलेने धडाकेबाज फलंदाजी करत २८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारासह ४५ धावा केल्या. त्याचे अर्धशतक पाच धावांनी हुकले. कोल्हापूरच्या रजनीशने १५व्या षटकात पहिल्याच चेंडूवर नाशिकच्या अथर्व काळेला (३)ला त्रिफळा बाद केले. याच षटकात चौथ्या चेंडूवर रोहन दामलेला झेल बाद केले. विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना ईगल नाशिक टायटन्सने यावेळी ३ गडी गमावले. योगेश डोंगरे (नाबाद ३), कौशल तांबे (नाबाद १) यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला.